फणस
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे फळ आहे. फणसात गरे असतात.
इतर नावे
[संपादन]- इंग्रजी : Jack Fruit, Jack-orange Wood
- कानडी : कुज्जा, तागे, पनस, हलसु, हलासिना
- गुजराती : वणस (ફણસ)
- शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
- संस्कृत : कंटकफल, कंटकाल, जघनेफल, पनस, पलस, फणस
- हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस
फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गऱ्यामध्ये एक बी असते. तिला आठोळी म्हणतात. फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गऱ्याला टेंबळी म्हणतात. छोट्या कच्च्या फणसाला कुइरी म्हणतात. कच्च्या फणसाची भाजी करतात.
फणसाला किंवा त्याच्या झाडाला निचूळ असाही एक शब्द आहे.
प्रकार
[संपादन]फणसाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
बरका
[संपादन]बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात. कोकणात या प्रकारच्या फणसाचा रस काढून तो तांदळाच्या रव्यात मिसळून सांदणे हा गोड पदार्थ करतात.
कापा
[संपादन]कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.
विलायती व अन्य फणस
[संपादन]फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात. सकल्या, नीर आणि डगूळ याही फणसाच्या जाती आहेत.
लागवड
[संपादन]फणसाची लागवड महाराष्ट्रातील कोकण भागात होते. तसेच देशावर किंवा घाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकारमानाने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.
फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ
[संपादन]- फणसाच्या साकट्याची भाजी
- कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी
- सांजणे / सांदणे (फणस इडली)
- तळलेले गरे
- फणसाची साठे (फणस पोळ्या)
- आठळ्यांची भाजी
- पावेची भाजी
- उकडलेल्या आठळ्या
फणसाचे गरे खाल्यावर त्यावर विड्याचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे. फणस पिकल्यावर त्यांचा सुवास सर्वत्र पसरतो. फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात. फणस पिकून मऊ झाल्यावर आतील गरे काढतात. या गांपासून पोळ्या, गऱ्यात तांदळाची कणी मिसळून सांदण करतात, ती ताजी खाण्यास चांगली लागतात. हिरव्या फणसाची भाजी करतात. कच्च्या फणसाचे गरे बारीक चिरून, खोबऱ्याच्या तेलात तळून त्याला तिखट, मीठ लावतात. हे खाण्यास कुरकुरीत व चविष्ट लागतात. काही ठिकाणी याच्या गऱ्यांपासून आईस्क्रीम बनवतात. फणसाच्या आतील बीला आठळी म्हणतात. या आठळ्या भाजून तसेच मीठ घालून उकडून खातात किंवा आठळ्यांची भाजी करतात, फणसाची टरफले (चारखंड) गाई-म्हशींना खायला देतात; त्यामुळे त्या भरपूर दूध देतात.
फणसाचे विविध उपयोग
[संपादन]झाडाचे लाकूड, होड्या, खेळणी, तंबोरा आणि वीणासारखी वाद्ये, उच्च प्रतीचे फर्निचर, कोरीवकाम असलेल्या शोभिवंत वस्तू, लाकडी पिंजरे, खोकी, बांधकाम वगैरेंसाठी उत्तम असते.