सामंतशाही
सामंतशाही ही शासनव्यवस्था मध्ययुगीन काळात युरोप खंडात अस्तित्त्वात होती. ही शासनव्यवस्था संरक्षण व सेवा या तत्त्वांवर आधारलेली होती. मध्ययुगीन काळात संपूर्ण युरोपात सामंतशाहीचे अस्तित्त्व असले तरी स्थल व कालानुसार तिची स्वरूपे भिन्न होती. सामंतशाही ही शासनपद्धती युरोपात इसवी सनाच्या ९व्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंत टिकून राहिली.
उगम
[संपादन]८व्या शतकातील रोमन साम्राज्य दूरपर्यंत पसरलेले होते. त्यामुळे राज्यकारभार करण्यात अडचणी येऊ लागल्या. ह्यातून मार्ग काढण्यासाठी रोमन सम्राट शार्लमेनने आपल्या सरदारांना जहागिरीच्या रूपाने मोबदला म्हणून भूप्रदेश देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेतून सामंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्ताधाऱ्याचा एक नवा वर्ग उदयास आला. अशा प्रकारे सामंतशाहीची पद्धत सुरू झाली.
भरभराटीची कारणे
[संपादन]राजकीय अस्थिरता
[संपादन]रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर युरोपात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शार्लमेनने युरोपात बलाढ्य साम्राज्य निर्माण करून ही अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न केला. शार्लमेननंतर सत्तेवर आलेल्या राजांनी साम्राज्याचे विभाजन केले. त्यांच्यात सत्ता स्पर्धा सुरू झाली. त्यातून रोमन साम्राज्यात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन सामंतांनी जीवनाच्या बहुतेक क्षेत्रांत अापले वर्चस्व प्रस्थपित केले. सामंतांनी आपली सत्ता अनाधिकाराने प्रबळ बनवली. ते जणू स्वतंत्र्य सत्ताधीशच बनले. अशा रीतीने सामंतशाही उदयास आली.
कमकुवत मध्यवर्ती शासन
[संपादन]रोमन सम्राट शार्लमेननंतर सत्तेवर आलेले बहुतेक राजे दुर्बल व अकार्यक्षम होते. त्यांचे शासनावर काहीही नियंत्रण नव्हते. राजांचे स्वतःचे सैन्य नसल्यामुळे संरक्षणासाठी त्यांना सामंतांवर अवलंबून राहावे लागे. यामुळे मध्यवर्ती शासन आणखी परावलंबी झाले. त्यामुळे सामंतांचे प्राबल्य वाढत गेले. सामंतांचे सैन्य व त्यांची कुळे राजाएेवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. त्यामुळे मध्यवर्ती शासनाची दुर्बलता आणखी वाढत गेली. अखेरीस सामंत आणि त्यांचे सैन्य, कमकुवत मध्यवर्ती शासनावर हुकुमत गाजवू लागले. ह्यातून सामंतशाही वृद्धिंगत झाली.
केद्रीय प्रशासनाचे पतन
[संपादन]रोमन साम्राज्याच्या अस्ताबरोबर साम्राज्यातील केंद्रीभूत प्रशासन व्यवस्था लोप पावली. मध्ययुगातील आर्थिक अडचणींमुळे मध्यवर्ती शासनास विकेंद्रीत व्यवस्था सुरू करणे आवश्यक झाले. विकेंद्रीकरण ही काळाची गरज बनली. राजा, सामंत, कुळे अशा उतरंडीने राज्यातील शेतजमिनीचे वाटप झाले. त्यामुळे सामंतशाहीला चालना मिळाली. सामंत प्रबळ असल्यामुळे त्यांच्या प्रदेशातील प्रशासनाचे सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले. ते त्यांच्या जहागिरीमध्ये प्रबळ बनले.
पूरक स्थानिक गरजा
[संपादन]मध्ययुगीन युरोपातील सामान्य लोकांच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजा सामंतशाहीच्या उत्कर्षास साहाय्यक ठरल्या. आक्रमक टोळ्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होई. काही वेळा शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागे. जमिनीतील पिके वाचविणे व जीविताचे संरक्षण होणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे होते. शेतकऱ्यांनी आपणहून आपल्या जमिनी आपआपल्या भागातील सामंतांच्या स्वाधीन केल्या आणि सामंतांच्या संरक्षणाखाली त्या जमिनी कसण्याचे अधिकार मिळवले. शेतकरी हे जमीनदार व सामंतांची कुळे बनले.
शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सामंतांच्या स्वाधीन केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा सामंतांशी निगडित झाल्या. संरक्षणाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतउत्पादनाचा ठराविक भाग कर म्हणून सामंतांना द्यावा लागे. शेतमालही सामंतांनाच विकावा लागे. वेळोवेळी आर्थिक मदतीसाठी सामंतांकडे हात पसरावा लागे. शेतकरी पूर्णपणे सामंतांलर अवलंबून असत. शेतकऱ्याची वेगाने घसरणारी आर्थिक परिस्थिती सामंतशाहीच्या विकासास साहाय्यकारक ठरली. सामंतशाही आणखी भक्कम बनू लागली.
स्वरूप
[संपादन]शेतजमिनीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. राजा हा राज्यातील जमिनीचा मूळ मालक होता. साम्राज्यातील जमीन कसण्यासाठी राजा ती सामंतांमध्ये वाटून देत असे. वरिष्ठ सामंत मिळालेल्या जमिनी कनिष्ठ सामंतांना वाटत होते. कनिष्ठ सामंत आपल्या जमिनी कुळांना देत असत. कुळांना सामंतांचे संरक्षण मिळे. त्याच्या बदल्यात ते सामंतांची सेवा करत.
सामंतशाहीत राजा हा सर्वात श्रेष्ठ होता. सामंतशाही व्यवस्थेवर त्याचे नियंत्रण होते. राजानंतर वरिष्ठ सामंत (ड्यूक व अर्ल), कनिष्ठ सामंत (बॅरन), सर्वात कनिष्ठ सामंत (नाईट) असा क्रम लागे. सामंतांनंतर शेतकरी व भूदासाचा क्रम होता. या व्यवस्थेत सामंत सर्वांत प्रबळ होते. सामंतशाहीची रचना पिरॅमिडसारखी होती.
सामंतशाहीतील समाज
[संपादन]सामंतशाही असलेल्या समाजात तीन वर्ग होते. पहिला वर्ग सामंत व जमीनदारांचा होता. हा वर्ग सर्वांत प्रभावशाली होता. तो सत्ता व वैभव भोगणारा होता. दुसरा वर्ग नगरवस्तीत राहणारा मध्यमवर्ग होता. तिसरा वर्ग शेतकऱ्यांचा व शेतमजुरांचा (भूदासांचा) होता. हा तिसरा वर्ग प्रत्यक्षात जमीन कसण्याचे काम करत असे. या वर्गातील लोकांना गुलामांप्रमाणे आणि वेठबिगारांप्रमाणे वागणूक मिळे. त्यामुळे या वर्गाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सर्वसामान्य जनतेची दुरवस्था हा सामंतशाहीचा मोठा दोष होता.
सरंजामशाहीतील स्त्रियांच्या कहाण्या
[संपादन]सरंजामशाहीतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे ‘चिरेबंदी कळा’ नावाचे पुस्तक डॉ. शारदा देशमुख यांनी लिहिले आहे.
मॅनॅार
[संपादन]प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त गढी आणि त्या सभोवतालचा प्रदेश म्हणजे मॅनॅार होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकऱ्यांच्या झोपड्या, चर्च, धान्याची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच मॅनॅार हे आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण होते. किल्लेवजा मॅनॅारमधील सामंत एखाद्या राजाप्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजराणे देत व मनुष्यबळ पुरवीत. मॅनॅारमध्ये नेहमी उत्सव, समारंभ, खेळांचे सामने व मेजवान्या चालत. मॅनॅारमुळे युरोपीय सामंतशाही अधिक बळकट झाली.
सामंतशाहीची भारतीय संकल्पना
[संपादन]भारतीय सामंतशाहीचे स्वरूप मध्ययुगीन युरोपीयन सामंतशाहीपेक्षा वेगळे होते. भारतीय सामंतशाही प्रामुख्याने जमीनजुमल्याच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित होती. सामंतशाहीत मालक (सामंत) व कुळ असे दोन घटक होते. शेतकऱ्यांना व कुळांना सर्व व्यवहार सामंताच्या मार्फत करावे लागत. सामंत व कुळे यांचे संबंध वंशपरंपरागत चालत. सामंत शेतकऱ्यांचे व कुळांचे संरक्षण करत. शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग सामंतांना द्यावा लागे. परिणामी, सामंत श्रीमंत झाले व शेतकरी गरीब बनले.
विजयनगर साम्राज्यात नायक हे सामंत होते. बहामनी साम्राज्याचे पाच शाह्यात विभाजन झाले. त्यांच्या राजवटीतही सामंतशाही होती. फक्त राजसत्ता बदलली पण स्थानिक सामंत मात्र तेच राहिले.
भारतातील सामंतशाहीचे समकालीन स्वरूप हैदराबाद संस्थानात पहावयास मिळते. तेलंगण प्रदेशात शेतीची रचना जमीनदारी पद्धतीची होती. मूठभर जमीनदारांच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी होत्या. गावेच्या गावे जमीनदारांच्या मालकीची होती. तेथील शेतमजूर हा त्यांचा वेठबिगार किंवा कूळ असे. वेठबिगार व कुळांची स्थिती अतिशय वाईट होती. मराठवाड्यात व कर्नाटकात मोठ्या प्रमाणात जहागीरदार होते. हे जहागीरदार शेतकऱ्यांची व कुळांची पिळवणूक करत. त्यांच्यावर अत्याचार करत. भारतीय सामंतशाहीची मुळे येथेच दिसून येतात.
सामंतशाहीचा ऱ्हास
[संपादन]मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोपमधील सामंतशाहीच्या ऱ्हासास सुरुवात झाली. सामंतशाही व्यवस्थेत अनेक दोष होते. ती विषमता व शोषणावर आधारलेली होती. युरोपाच्या अर्थव्यवस्थेत हळूहळू बदल होऊ लागले, वस्तुविनिमय ही परंपरागत पद्धती मागे पडून नाण्यांचे चलन अस्तित्त्वात आले, व त्याद्वारे आर्थिक व्यवहार होवू लागले, दळणवळणाच्या साधनातील सुधारणेमुळे युरोपातील व्यापार वाढला. व्हेनिस, जिनोआ, फ्लॅारेन्स यांसारखी नवीन बाजारपेठा असलेली शहरे उदयास आली. आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारा व्यापारी व विक्रेत्यांचा नवा वर्ग युरोपात उदयास आला. या वर्गाने व्यापारवाढीसाठी राजांना पाठिंबा दिला. परिणामी राजे व राजसत्ता प्रबळ वनली. सामंतांचा प्रभाव कमी होऊ लागला. ख्रिस्ती व इस्लामधर्मीयांत झालेल्या धर्मयुद्धांत, ख्रिस्तीधर्माच्या रक्षणासाठी सामंत युद्धात सहभागी झाले. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी युरोपातील राजे पुढे आले. राजांची प्रतिष्ठा वाढली. राजेशाहीचे महत्त्व वाढले. सामंतांची सत्ता कमकुवत होत गेली आणि सामंतशाहीच्या ऱ्हासास सुरुवात झाली. युरोपातील समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था यांच्यात बदल घडून आल्यानेही सामंतशाही लोप पावत गेली. इ.स. १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने सामंतशाहीवर अखेरचा घाव घातला व सामंतशाहीचा शेवट झाला.